"आनंदयात्री"

२५\०९\२०१८
आतुरतेने वाट बघितला जाणारा आजचा दिवस ,
...म्हणजे स्वतःचाच वाढदिवस !!
आयुष्यात बघितलेल्या पावसाळ्यांचा हिशेब वगैरे सांगणारा दिवस.

कायमच थोडा तिरकस वाटणारा ३६ चा आकडा पार करताना आज तो तितका तिरका वाटत नाही.

अचानक सोडून गेलेली वडीलधारी माणसं या वाढदिवसाला नाहीत,आणि यापुढे पण कधीच नसणारेत ही जाणीव ,कातरवेळ हा शब्द अधोरेखित करत राहते.
पण अंतरवर्तुळातली नाती फार काळ दुःखाला ही टीकू देत नाहीत.
भेटायचं ठरतं आणि पडत्या फळाची आज्ञा मानून आपण ठरलेल्या वेळेत नियोजित ठिकाणी हजर
(ता.क.: ठरलेल्या वेळेत पोचणं आता तितकंसं फॅशनेबल नाही राहिलं..माझ्यासारखंच )

जंगली महाराज रस्त्यावर आता पहिल्या सारख्या दुतर्फा गाड्या पळत नाहीत
एका बाजूला प्रशस्त (पुण्याच्या मानाने ) म्हणावा असा मोठ्या मोठ्या आकाशचिन्हानी उजळलेला पदपथ ,
आणि त्याला लागूनच काळाच्या ओघात घट्ट मुळं रोवून वाकलेली पण उभी राहिलेली दिमाखदार झाडं .
जुने वाडे आणि पुसट झालेल्या पुणेरी पाट्या , तर दुसऱ्या बाजूला डागडुजी करून चमकवलेलं संभाजी उद्यान !!
शिवसागर हॉटेल ची पडवी वजा ओसरी , रस्त्यात बसलोय कि आत बसलोय प्रश्न पडावा अशी
कंटाळवाण्या पावसाळी वातावरणाचा अंत सांगणारी सप्टेंबर च्या शेवटातली निवांत हवेशीर कोरडी संध्याकाळ ,,
सगळंच सृष्टीनियमांना अनुसरून ...एकदम ठरल्या सारखं.. पण आठवणी जागवणारं .. नॉस्टॅल्जिक !!

या सगळ्यात , भारत स्वतंत्र झालेला माहित नसून पण ,स्वातंत्र्य उपभोगण्यात किंचितही कमी राहू ना देणारा .. ३ वर्षाचा अधिराज .
गाड्या.... माणसं ..रहदारी ..खड्डे .. कशाचीच पर्वा ना करता उन्मुक्त हुंदडणारा ... सेकंदाला १३० हार्टअटॅक देणारा .. आणि फक्त आई बाबा डिकोड करू शकतील अशा भाषेत बोलणारा .
त्याच्याबरोबर कुणाची तरी वाट बघत रस्त्यात उभं राहणं म्हणजे महायुद्धाहून कर्मकठीण .

कसल्याशा दैवी योजनेचा भाग असल्यासारखा एखादा देवदूत पृथ्वीतलावर अवतरावा तसा हा खेळणीवाला कुठूनतरी अवतरला.
रंगीबेरंगी फुगे , आवाज करणाऱ्या बंदुका , लाईट वाले बॉल , दुर्बिणी अशी सगळी त्याची आयुधं.
साधारण चाळीशी मधला माणूस. एक पाय अधू पण कुठेही त्याची खंत नाही ,खेळणी ची काठी बांधायला आणि चालताना आधाराला बरोबर एक वॉकर.
पेहरावाला आणि परिस्थितीला न शोभणारं श्रीमंत स्मितहास्य ..महागड्या दागिन्यांसारखं .. लक्षवेधक .
अधिराजच्या अनाकलनीय भाषेतल्या ..अगणित प्रश्नांना उत्तर देण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न..न कंटाळता ..न वैतागता !!
थोड्याच वेळात त्या दोघांची गट्टी जमली आणि अधिराज आणि तो एकमेकांच्या विश्वात रमले.
अधिराज नि घेतलेला लाईट चा बॉल बंद पडला तसा खेळणीवाल्याने त्याच्या जादूच्या पेटीतून एक एक सामग्री काढून पुन्हा चालू करून दिला.
जसा जास्त वेळ जायला लागला तसे आम्ही या मूक चित्रपटात गुंतायला लागलो.
संवादाला भाषेची गरज नाही याची पूर्ण खात्री पटावी इतकं सगळं विनासायास.

एकीकडे अनेक स्नेहींचे दिवसभरातले फोन आणि दुसरीकडे या दोघांची ही हेवा वाटावी अशी काही मिनिटांची मैत्री.
एक अनोखा सोहळा , नात्यांचे सगळे आराखडे चुकीचे ठरवणारा.
कसल्या अपेक्षा नाहीत , कसले ओझे नाही , ना कसला आव ना कसला मोठेपणा.

काय नातं असेल यांच्यात , कशी यांची इतकी नाळ जुळावी , असा प्रश्न सारखा पडायला लागला.
सगळं काही असून आनंदाला नाकारणारे आपण आणि आहे तेवढ्यात असीमित आनंद उधळणारे हे दोघे.
दोघांचा एक च धर्म , आनंद उपभोगणे आणि आनंद वाटणे !
विचारांती पुलं चा एक शब्द आठवत राहिला...
हे दोघे तर "आनंदयात्री"

Comments

  1. निस्वार्थ आनंदयात्री आहेत दोघेही....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Dreamgirl

Life without friends....i prefer death ....